शेतात काम करणाऱ्या इसमावर वाघाने हल्ला ,केल्याने इसम जागीच ठार ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

शेतात काम करणाऱ्या इसमावर वाघाने हल्ला ,केल्याने इसम जागीच ठार ।
नागभीड :-
दिनांक 23/7/24.
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा येथील कंपार्टमेंट नं ४२०/ ७५६ मध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. दोडकू झिंगर शेंदरे (६५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
नागभीड तालुक्यात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू होती. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकास फटका बसला. वाहून गेलेल्या धान्याच्या ठिकाणी दोडकू धान रोवत होता. त्याचे हे काम सुरू असतानाच वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले. ठार केल्यानंतर त्याला तो फरफटत लागूनच असलेल्या झुडपी जंगलात नेत असताना जवळ शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पडले. त्यांनी आरडाओरड करून गावात माहिती दिली. गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी लागलीच वनविभाग आणि पोलिस विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे आणि ठाणेदार विजय राठोड घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी ७ वाजता मृतकाच्या पार्थिवाचा मोका पंचनामा करण्यात आल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.