
शेतात पाणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने केला हल्ला शेतकरी जागीच ठार …
मुल ,
दिनांक 5/04/2025.
मुल तालुक्यातील चितेगाव येथील घटणा ….
मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी एका युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. शेषराज पांडुरंग नागोशे (वय 38) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेषराज हे त्यांच्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीतः
चितेगाव परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी याच वाघाने गावात घुसून एक गाय आणि एका गोह्याला ठार केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही प्राणघातक घटना घडली. यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वन विभागाकडून पंचनामा:
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.