“विद्यापीठ आपल्या गावात’’ उपक्रम राबविणारे गोंडवाना राज्यातील पहिलेच विद्यापीठ !
मुख्य संपादक

“विद्यापीठ आपल्या गावात’’ उपक्रम राबविणारे
गोंडवाना राज्यातील पहिलेच विद्यापीठ
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली,
दि. 20 :
कोरोनानंतरच्या काळात विविध भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. या गळतीमागे विद्यार्थ्यांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक कारणे कारणीभूत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील तसेच विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा, तसेच अत्यंत गरिबी आणि संधीचा अभाव यामुळे पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून “विद्यापीठ आपल्या गावात’’ हा नाविण्यपुर्ण उपक्रम गत वर्षीपासून राबविल्या जात आहे.
जे विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये शैक्षणिक जाणीव निर्माण करणे, शिक्षणाचा प्रचार-प्रसार करणे, तसेच या भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या मुख्य भूमिकेतून “विद्यापीठ आपल्या गावात’’ हा उपक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमांतर्गत गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील अर्धवट शिक्षण सोडलेले, शाळाबाह्य व इतर अडचणीमुळे शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारीत शिक्षण देणे हा गोंडवाना विद्यापीठाचा मानस आहे.
सर्वप्रथम या नाविण्यपुर्ण उपक्रमाची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत जांभळी (ता.धानोरा) या गावातून करण्यात आली. तदनंतर, चंद्रपूर जिल्हयाच्या कोरपना तालुक्यातील बिबी, जिवती तालुक्यातील नगराळा, आणि वरोरा तालुक्यातील खेमजई येथे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठ गावातच शिक्षण आणि पदवी देणार आहे. “विद्यापीठ आपल्या गावात’’ हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणारे गोंडवाना राज्यातील पहीलेच विद्यापीठ ठरले आहे.
जे विद्यार्थी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षणाच्या प्रवाहातून दुर गेले आहेत अथवा महाविद्यालय सोडले आहे, अशा विद्यार्थ्यांना एकत्रित करुन सांयकाळी 6 ते 10 या कालावधीत गावातच रात्रकालीन महाविद्यालय भरविले जाते. यासाठी विद्यार्थ्यांना नवीन स्वरूपाचे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयाद्वारे तयार करण्यात आले आहे. यामध्ये, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास, वनव्यवस्थापन, वनउपज, बांबू हस्तकला, रानभाजी आणि व्यावहारीक मराठी व इंग्रजी तसेच ग्रामीण विकास, संगणक साक्षरता, अर्थशास्त्र आदी विषयांचा समावेश करण्यात आला असून या अभ्यासक्रमात प्रकल्प आणि प्रॅक्टीकलवर भर देण्यात येत आहे.
भविष्यामध्ये या उपक्रमात गोंडवाना विद्यापीठ, कार्यक्षेत्रातील 100 गावांचा उद्देश ठेवून उपक्रमाची व्यापकता वाढवणार आहे. त्यादृष्टीने अनेक ग्रामपंचायतीमधून मागणी सुद्धा येवू लागली आहे.