राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अध्यासनांची भूमिका महत्वपूर्ण- डॉ. प्रमोद मुनघाटे।
मुख्य संपादक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अध्यासनांची भूमिका महत्वपूर्ण- डॉ. प्रमोद मुनघाटे।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली दि. 19/8/24.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात आल्याने या धोरणामध्ये उपक्रमशील अध्यासनांची भूमिका महत्वपूर्ण राहणार असल्याचे मत साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम महाराज प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील सुप्रसिध्द संशोधक व लेखक डॉ.अशोक राणा, मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे, संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. हेमराज निखाडे आदी उपस्थित होते.
डॉ. प्रमोद मुनघाटे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्याधारीत शिक्षणाचा समावेश असल्याने विद्यापीठ ज्या परिसरामध्ये असते त्या परिसरातील सामाजिक समस्या व सांस्कृतिक पर्यावरण आणि परंपराचा विद्यापीठ पातळीवर अभ्यास होणे आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज अध्यासनामार्फत समाजाला ज्ञान, संस्कृती, आणि परंपरेची ओळख होईल. गोंडवाना विद्यापीठ आदिवासी कल्याणाच्या दृष्टीने उद्योगविषयक विविध उपक्रम राबवित आहे. याच मालिकेतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र असून आजचे प्रबोधन शिबिर याच परंपरेतील आहे. अध्यासनाच्या माध्यमातून अभ्यासक्रमात बंदिस्त गोष्टीपेक्षा वेगळे उपक्रम राबविता येते. तसेच पुढच्या पिढीपर्यंत पोहचविता येते. साहित्य अभिनव पद्धतीने नेण्याचे स्वातंत्र्य अध्यासनामध्ये असल्याचे डॉ. मुनघाटे म्हणाले.
संत तुकाराम हे संतकवी होते. आजच्या काळात प्रबोधनशैली आणि भाषा वेगळी असेल पण किर्तनाची काळानुरूप बदलती आधुनिक शैली विचारत घेता आजचे प्रवचनकार श्री. अशोक सरस्वती यांचे प्रवचन महत्वाचे ठरते. तत्कालीन काळात पंढरीची वारी हे ज्ञानाचे क्षेत्र मानले गेले. गीता ही संस्कृतमध्ये होती आणि सामान्याचे शब्द संत तुकाराम महाराजांकडे होते. म्हणूनच आपली भाषा संत तुकाराम महाराजांनी घडवलेली आहे.अलीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हेतू साध्य करण्यासाठीचे उत्तर आजच्या शिबिरात आहे. भारतीय ज्ञान परंपरेच्या दृष्टिकोनातून अशा शिबिरांचा समावेश होईल.
सदर कार्यक्रमात मान्यवरांचा परिचय डॉ. सविता गोविंदवार तर आभार डॉ. हेमराज निखाडे यांनी मानले.