तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये समतेचा स्वर -अशोक सरस्वती ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये समतेचा स्वर -अशोक सरस्वती ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली, दि. 19/8/24.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या किर्तनामध्ये सदैव समतेच्या विचारांचा स्वर धगधगत राहिल्याने आजही त्यांचे अभंग सामाजिक परिवर्तनासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत आहेत असा संदेश अशोक सरस्वती यांनी आपल्या कीर्तनामधून प्रतीत केला.
गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम महाराज प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक सरस्वती यांचे वारकरी संत परंपरेतील प्रवचन शैली या विषयावर कीर्तन झाले.
याप्रसंगी साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख व संत तुकाराम अध्यासन प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, संशोधक व लेखक डॉ. अशोक राणा, मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासनाचे समन्वयक डॉ. हेमराज निखाडे यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
अशोक सरस्वती आपल्या कीर्तनातून म्हणाले, संत तुकाराम महाराज यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थित अनेक संकटांचा सामना करीत आपल्या अभंगांची निर्मीती केली. त्यांच्या अभंगांमधून जीवनाकडे पाहण्यास सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होतो. त्यांचे अभंग सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आजही अनमोल ठरतात. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी असे अनेक महापुरुष संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी प्रभावीत झालेले आहेत. संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षापूर्वी निर्माण केलेल्या अभंगातून त्यांच्या विद्वत्तेची प्रचिती येते. समाजासाठी आपले सर्वस्व बहाल केलेल्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये आजही सामाजिक समतेचा झरा पाझरताना दिसतो. त्यामुळे विद्यार्थी व तरुण पिढीने तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास करणे काळाची गरज असल्याचे अशोक सरस्वती म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.अमोल चव्हाण यांनी केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. श्याम खंडारे यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. रोहित कांबळे यांनी करुन दिला तर आभार प्रा. अनंता गावंडे यांनी मानले. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी, शिबीरार्थी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.