
चामोर्शी पोलिसांच्या पुढाकारातून बेपत्ता बाप लेकाची दीड वर्षांनी भेट.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चामोर्शी -दिनांक 11/01/2024
रोजी मौजाभिक्षी तालुका चामोर्शी या गावांमध्ये रात्र च्या वेळी साधारण पन्नास वर्षाचा वेडसर इसम आला होता. सदर इसम हा रस्ता भटकून फिरत होता. सदर बाबतची माहिती गावचे पोलीस पाटील श्रीमती सविता भूपती वाळके यांनी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी तात्काळ बिक्शी चे बीट जमादार सहाय्यक फौजदार श्री धनंजय मेश्राम, चालक पोलीस हवालदार ईश्वर मडावी व पोलीस अंमलदार देवराम पटले यांना रवाना केले आणि चौकशी सुरू केली. यावरून वाट भटकलेल्या इसमाने त्याचे नाव मुनेश्वर किसन यादव वय 50 वर्ष रा मेसा तालुका झुंजारपूर जिल्हा मधुबनी (बिहार) असे सांगितले व या व्यतिरिक्त कोणतेही माहिती सांगितली नाही. त्यानंतर पोलिसांनी चौकशीची चक्रे वेगाने फिरवून त्याचा मुलगा नामे आमोद कुमार मुनेश्वर यादव यांच्याशी संपर्क केला असता त्याने धक्कादायक माहिती दिली की, अमोल कुमार यादव व त्याचे वडील हे दोघे कामाच्या शोधात जुलै 2022 मध्ये मुंबई येथे आले होते. काम शोधत असताना जुलै 2022 मध्ये त्याचे वडील मुंबई येथे हरवले त्यानंतर भरपूर शोध घेऊन ते मिळाले नाहीत. वडील मिळून न आल्याने मुलगा त्याच्या मूळ गावी बिहार येथे परतला होता त्यांनी पूर्ण आशा सोडून दिली होती. परंतु चामोर्शी पोलिसांनी संपर्क केल्यानंतर आपल्या वडिलांना घेऊन जाण्यासाठी मुलगा व त्याचे नातेवाईक बिहार येथून गडचिरोली येथे येण्यासाठी निघाले दरम्यान हरवलेल्या इसम मुनेश्वर किसन यादव यांची दोन दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था पोलीस पाटील श्रीमती सविता वाळके व सरपंच अंजुबाई मोटघरे यांनी केली. नातेवाईक आल्यानंतर पोलिसांनी मुनेश्वर यांना नवीन कपडे देऊन आनंदाने मुलाच्या स्वाधीन केले.
त्यावेळी मुनेश्वर किसन यादव व मुलगा अमोदकुमार मुनेश्वर यादव व सर्व गावकरी यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. पोलिसांच्या सतर्कतेने व प्रयत्नाने तब्बल दीड वर्षांनी पिता पुत्रांची भेट झाल्याने चामोर्शी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.