
सरपंच व सचिवांसाठी ग्राम विकासावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न..
पिरामल फाऊंडेशनचा उपक्रम ..
चामोर्शी ,
पिरामल फाउंडेशनच्या वतीने चामोर्शी पंचायत समितीत 10 जानेवारी 2025 रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा विषय होता, “सरपंच व ग्रामसेवक यांचे नेतृत्व व ग्राम पंचायत विकास योजना (GPDP)”. या कार्यशाळेत तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचे सरपंच, सचिव आणि पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत स्थानिक शाश्वत विकास उद्दिष्टे (LSDG), GPDP आणि ई-ग्रामस्वराज पोर्टल या विषयांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः, सरपंच, सचिव आणि गांधी फेलो यांच्या सहकार्याने पुढील कृती आराखडा तयार करण्यावर भर दिला. या आराखड्याद्वारे ग्रामपंचायतींचा विकास कसा करायचा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
“आदर्श पंचायत” आणि “स्थानीय स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी ग्रामसेवक व सरपंचांचे नेतृत्व” या विषयांवर झालेल्या परस्परसंवादी चर्चांमध्ये सरपंच आणि सचिवांनी उत्साहात सहभाग घेतला. या चर्चांमध्ये नेतृत्व कौशल्य, आदर्श पंचायत आणि GPDP यांच्या यशस्वी अंमलबजावणीसंदर्भात उदाहरणे आणि व्हिडिओ दाखवण्यात आले.
कार्यशाळेत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. बोरकुटे, श्री. श्रीरामे, श्री. पेंदारे, श्री. शेख आणि श्री. जुलमे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कैवल्य एजुकेशन फाउंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर महेश धांडोले, प्रोग्राम लीडर अविनाश कंजे, राहुल बरचे, अंकुश नागुलवार व गांधी फेलो यांनी विशेष योगदान दिले..