शिक्षकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी क्रीडा व कला महोत्सव हे एक प्रकारचे व्यासपीठ- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
मुख्य संपादक

शिक्षकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी क्रीडा व कला महोत्सव हे एक प्रकारचे व्यासपीठ-कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
गडचिरोली,
दि.20/03/2024.
विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांमध्ये देखील कला व खेळाप्रती आवड असते. ही आवड व छंद जोपासणे, शिक्षकांमध्ये खेळ आणि कलेप्रती उत्साह निर्माण करणे व त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी शिक्षक क्रीडा व कला महोत्सव हे एक प्रकारचे व्यासपीठ असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठ परिसरात दोन दिवसीय शिक्षक क्रीडा व कला महोत्सव (कलादर्पण-2024) चे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे,शारिरीक शिक्षण व क्रीडा विभागाच्या संचालक डाॅ. अनिता लोखंडे तसेच नागपूर, हार्मोनि इव्हेंटचे संचालक राजेश समर्थ, सुप्रसिद्ध गायक प्रफुल सांगोळे आणि कलर्स उपविजेती, स्वर्ण स्वर भारत, इंडियन आयडल फेम स्वस्तिका ठाकूर आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले, सर्वप्रथम सन-2022 मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अमृत कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन विद्यापीठामार्फत करण्यात आले होते आणि ते शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी देखील झाले. सदर महोत्सव यशस्वी करण्यामागे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गोंडवाना विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव असे विद्यापीठ आहे, ज्या ठिकाणी वर्षभरात विविध कार्यक्रम व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांनी देखील असे उपक्रम राबवावेत. या कला व क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये उत्साह व नवचेतना निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाला विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांची उपस्थिती होती.