
थेट राज्य बालहक्क आयोगाकडे तक्रार …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
साखरा येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसमोर गतिरोधक तयार करा !
ग्रामपंचायत साखरा येथील विद्यमान उपसरपंचळ तथा सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चुधरी ( बोरकुटे ) यांची प्रशासनास मागणी..
गडचिरोली ,
नागपूर राष्ट्रीय महामार्गांतर्गत येणाऱ्या साखरा गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत गावातील बालके शिक्षण घेत आहेत. सदर महामार्ग दोन भागात विभागल्याने रस्ता ओलांडताना महामार्गावर भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे बालकांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे गतिरोधक उभारण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. या अंतर्गत प्रशासनाने मंजुरी दिली होती. मात्र चार वर्षांचा कालावधी लोटूनही गतिरोधक उभारण्यात न आल्याने साखरा गावातील उपसरपंच अर्चना चुधरी ( बोरकुटे ) गतिरोधकासाठी थेट राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे.
साखरा येथील सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चुधरी यांनी मा.जिल्हाधिकाऱी गडचिरोली मा. मुख्यकार्यकारी अधिकारी गडचिरोली तथा राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली- नागपूर या 353 सी महामार्गावर साखरा गाव असून या महामार्गालगत 20 मीटर अंतरावर जि. प. उच्च प्राथमिक शाळा आहे. येथे गावातील बालके इयत्ता 1 ते 7 वीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. सदर बालके महामार्ग ओलांडून शाळा गाठतात. यादरम्यान भरधाव वाहनांमुळे बालकांचा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, शाळेसमोर गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. या अंतर्गत 2019 मध्ये राष्ट्रीय बालहक्क आयोग दिल्लीतथा जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या जनसुनावणीत सदर प्रकरण निकाली काढण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले होते. मात्र चार वर्षांचा कालावधी लोटूनही शाळेसमोर गतिरोधक उभारण्यात न आल्याने प्रशासन बालकांच्या जिवाशी खेळत असून बालकांचे हक्क व अधिकाराचे हनन करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नामांकित शाळा व जि. प. मध्ये भेदभाव !
बालकांच्या सुरक्षितेसाठी गतिरोधकाची मागणी करूनही गत चार वर्षांपासून शाळेसमोर गतिरोधक न उभारल्याने शिक्षण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांना विचारणा केली असता सदर प्रकरण आमच्या विभागाशी संबंधित नसल्याचे उत्तर देत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. तर गडचिरोली शहरात याच महामार्गावर एका नामांकित शाळेत श्रीमंत बालके शिक्षण घेत असताना प्रशासनाद्वारे नामांकित शाळेसमोर गतिरोधक तयार केलेला आहे . मात्र गरीब मजूर, शेतकरी वर्गाची मुले शिक्षण घेत असलेल्या याच महामार्गावरीलसाखरा जि. प. शाळेसमोर गतिरोधक उभारण्यात न आल्याने असा भेदभाव का? असाही प्रश्न निवेदनातून उपस्थित केला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून साखरा जि. प. शाळेतील बालकांची अडचण लक्षात घेत महामार्गावर शाळेसमोर गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामपंचायत च्या विद्यमान उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चुधरी ( बोरकुटे ) यांनी केली.