सोलापूर शहरातील संजीवनी आणि सरोजिनी भोजने या दोन सख्ख्या बहिणींनी गरीबीशी झुंज देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश
मुख्य संपादक संतोष मेश्राम

सोलापूर शहरातील संजीवनी आणि सरोजिनी भोजने या दोन सख्ख्या बहिणींनी गरीबीशी झुंज देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश …
सोलापूर ,
सोलापूर शहरातील संजीवनी आणि सरोजिनी भोजने या दोन सख्ख्या बहिणींनी गरीबीशी झुंज देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. टॅक्स असिस्टंट पद मिळवणाऱ्या या बहिणींच्या प्रवासात कठीण आर्थिक परिस्थिती, मर्यादित संसाधने आणि अपयशाचा सामना करावा लागला. त्यांच्या कुटुंबात एकूण सहा जण असून, वडील ज्योतीराम भोजने यांनी पाचवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्यांनी एक छोटेसे गॅरेज सुरू करून कुटुंबाची उपजीविका केली, तर आई रेश्मा यांनी गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. परिस्थिती सुधारण्यासाठी संजीवनी आणि सरोजिनी यांनी शिक्षणाच्या जोरावर काहीतरी मोठे करण्याचा निर्धार केला.
या बहिणींनी बीकॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून 2018 पासून MPSC परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. सात वर्षांच्या प्रयत्नांत त्यांनी PSI, सेल्स टॅक्स आणि टॅक्स असिस्टंटसाठी अनेक परीक्षा दिल्या, परंतु दरवेळी काही गुणांच्या फरकाने अपयश आले. त्यातच तीन वर्षे कोरोना महामारीमुळे अभ्यासात अडथळा निर्माण झाला. आर्थिक टंचाईमुळे अभ्यासासाठी योग्य सुविधा नव्हत्या, पण त्यांनी हार मानली नाही. अखेर सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर त्यांना यंदाच्या MPSC परीक्षेत यश मिळाले आणि त्यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात क्लार्क म्हणून निवड झाली.
त्यांच्या अभ्यासासाठी घरात पुरेशी जागा नव्हती, म्हणून वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी त्यांचे घर मोफत उपलब्ध करून दिले. तसेच मावस भाऊ प्रशांत बचुटे यांनी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधार दिला. आई रेश्मा आणि आजी तारामती यांनी रोजचा स्वयंपाक अभ्यासाच्या खोलीत आणून देत त्यांची सोय पाहिली. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे संजीवनी आणि सरोजिनी यांनी परीक्षेच्या तयारीत पूर्ण लक्ष केंद्रित केले. अखेर, त्यांचे यश संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण ठरले आणि त्यांचे घर आनंदोत्सवाने गजबजून गेले.