विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी पी.एम-उषा योजना महत्वपुर्ण ठरेल -कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे
मुख्य संपादक

विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी पी.एम-उषा योजना महत्वपुर्ण ठरेल -कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली,
दि. 27/03/2024.
विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा तसेच सर्वांगीण विकासासाठी पीएम-उषा योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून 100 कोटी रुपये निधी गोंडवाना विद्यापीठास मंजूर झाला आहे. विद्यापीठाच्या बळकटीकरणासोबतच शिक्षण, संशोधन व कौशल्याच्या संधी येथील विद्यार्थ्यांना मिळतील. चांगल्या योजना व उपक्रम राबविता येईल. आणि त्याचा जास्तीतजास्त लाभ विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्याना होईल त्यामुळे विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी पीएम-उषा योजना महत्वपुर्ण ठरेल, असा विश्वास कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केला.
पीएम-उषा योजनेच्या अनुषंगाने, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, सभागृह येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. सभेला, कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्यासह, रुसाचे सहसंचालक राहुल म्हात्रे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, सल्लागार प्रमोद पाबरेकर, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, लेखा व वित्त अधिकारी भास्कर पठारे, डॉ.दिनेश नरोटे, डॉ. उत्तमचंद काबंळे, डॉ. प्रिया गेडाम, डॉ.अनिता लोखंडे, डॉ. नंदकिशोर माने, डॉ. क्रिष्णा कारु तसेच विद्यापीठातील विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले, शासनाकडून मिळालेल्या अनुदानाद्वारे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारणे हा मुख्य उद्देश आहे. सदर प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यासंदर्भात श्री. राहुल म्हात्रे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. पीएम-उषा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून विद्यापीठास 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत मेरु (MERU) साध्य करण्यासाठी उद्देश स्पष्ट असणे आवश्यक आहे. याकरीता नमूद बाबींचा प्रकल्प अहवाल अद्ययावत करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत 44 बाबी साध्य करण्यासाठी विभाग प्रमुखांच्या टिमचे प्राधान्य राहील आणि योजनेत मिळालेल्या अनुदानातून जलद गतीने कामे केल्या जाईल, असे कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले.
रुसाचे सहसंचालक राहुल म्हात्रे म्हणाले, देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील गुणवत्ता सुधारणे आणि उच्च शिक्षणासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) ही योजना 2013 मध्ये सुरु केली. त्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा 2018 मध्ये राबविण्यात आला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने या योजनेचा तिसरा टप्पा पीएम-उषा या नावाने 2023 मध्ये जाहीर करण्यात आला. पीएम-उषा योजनेत मेरू हा घटक नवीन आहे. मेरू (MERU) घटकांतर्गत 100 कोटी रुपये निधी विद्यापीठास मंजूर झाले. हा निधी खर्ची करणे ही शासनाने मोठी जबाबदारी आपल्याला दिली आहे. तसेच पीएम उषा योजनेंतर्गत महाविद्यालयाला प्रत्येकी 5 कोटी रु. इतका निधी मिळणार असल्याचे श्री. म्हात्रे यांनी सांगीतले. तसेच योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या.
सल्लागार प्रमोद पाबरेकर म्हणाले, विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा मिळण्याकरीता सुविधा उभाराव्यात. तसेच विद्यापीठातील विभाग प्रमुखांनी प्रस्ताव असल्यास द्यावेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे यांनी उत्कृष्टपणे प्रस्तावाचे सादरीकरण केले. कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी टिमच्या सहकार्याने व समन्वयाने सदर 44 बाबीचे आव्हान विहीत वेळेत पुर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.
पी.एम.-उषा योजनेंतर्गत पायाभूत सुविधा व बांधकाम, रिनोव्हेशन ॲण्ड अपग्रेडेशन, वैज्ञानिक उपकरणांची खरेदी, सॉफ्ट कम्पोनन्ट असा निधी प्राप्त होणार आहे.