ग्लासफोर्डपेठा येथील वृद्धा गंगक्काच्या संघर्षमय जीवनाला खाकीचा आधार -उपपोस्टे बामणीने स्व खर्चातून बांधून दिले पक्के घर
मुख्य संपादक

ग्लासफोर्डपेठा येथील वृद्धा गंगक्काच्या संघर्षमय जीवनाला खाकीचा आधार -उपपोस्टे बामणीने स्व खर्चातून बांधून दिले पक्के घर.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि 16 / जाने .24
सिरोंचा :-
जिल्हा पोलिस दल नक्षल्यांशी दोन हात करीत असतांना सर्वसामान्य नागरिक, आदिवासींच्या मदतीला नेहमीच धावून जात आली आहे. पोलिस दलाच्या विविध सामाजिक उपक्रमामुळे मागील काळापासून पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिकच वृद्धिंगत होत आला आहे. खाकी नेहमीच निराधारांना आधार देण्यासाठी पुढे सरसावत आली आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रात कार्यरत असलेल्या बामणी उपोलिस ठाण्यातील अधिकारी व जवानांनी दिला आहे. ग्लासफोर्ड पेठा येथे झोपडीवजा घरात राहणा-या गंगक्का या महिलेचे संघर्षमय जीवन लक्षात घेत पोलिस दलाने स्वखर्चाचे पैसे गोळा करुन पक्के घर बांधून दिले. यामुळे ख-या अर्थाने गंगक्काला खाकीने आधार दिला आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या बामणी उपपोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या ग्लासफोर्डपेठा येथे गंगक्का कावरे (90) वृद्ध निराधार महिला कुड्याकाड्याच्या झोपडीवजा घरात वास्तव्याने राहत होती. घरात पेटणा-या चिमणीवर आयुष्य जगणा-या या वृद्ध महिलेच्या संघर्षमय जीवनाची माहिती उपपोस्टे बामणीच्या पोलिस अधिका-यांना प्राप्त झाली. या वृद्धेच्या संघर्षमय जीवनाला देण्याचा निर्धार पोलिस अधिका-यांनी केला. याअंतर्गत प्रभारी पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन मस्के, राज्य राखीव पोलिस बल क्र. 10 चे पोलिस निरीक्षक संजय कुंभार, पोलिस उपनिरीक्षक शाहू दंडे, पोलिस उपनिरीक्षक अनिकेत बंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस अंमलदार व एसआरपीएफ सोलापूरच्या अमलदारांनी वर्गणी गोळा केली. याअंतर्गत घर बांधणीसाठी विविध साहित्य खरेदी करुन सलग तीन दिवस घर उभारणीसाठी परिश्रम घेतले. त्यांच्या या परिश्रमातून गंगक्का कावरे यांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देणारे पक्के घर बांधून देण्यात आले. यासोबतच घरात विजेची सुविधा, भांडीकुंडी तसेच राशन देण्यात आले.
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उप पोस्टे बामणी पोलिसांनी ग्लासफोर्ड पेठा येथील गंगक्का कावरे वृद्धेला घर बांधून देत त्यांच्या जीवनात मकर संक्रांत निमित्त गोडवा निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. बामणी उपपोस्टेचे अधिकारी व अंमलदार तसेच एसआरपीएफ अधिकारी, अंमलदारांच्या या पुढाकारामुळे खाकीवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.