“विद्यापीठ आपल्या गावात” उपक्रमाची खेमजई येथे सुरुवात, गोंडवाना विद्यापीठ देणार गावातच शिक्षण आणि पदवी
मुख्य संपादक
विद्यापीठ आपल्या गावात” उपक्रमाची खेमजई येथे सुरुवात.
गोंडवाना विद्यापीठ देणार गावातच शिक्षण आणि पदवी…
गडचिरोली,
दि. 13/4/24.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
अत्यंत गरिबी आणि संधीचा अभाव यामुळे पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा “विद्यापीठ आपल्या गावात” हा उपक्रम राबविल्या जात आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन वरोरा तालुक्यातील खेमजई या गावात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आमुदाला चंद्रमौली यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रंजना लाड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रवीण मुधोळकर, आदर्श पदवी महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर, गुरुदास आडे, सामाजिक कार्यकर्ता डॉ. प्रमोद गंपावार, खेमजई ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. मनीषा चौधरी तसेच नागरीक उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना डॉ. चंद्रमौली म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत सुरू केलेला हा अभिनव अभ्यासक्रम पुस्तकी शिक्षणाचा अतिरेक टाळून यामध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, उद्योगाच्या संधी याबाबतच्या ज्ञानासोबत पदवी प्राप्त होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रंजना लाड यांनी खेमजई गावाचे आनंद निकेतन महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध आणि शिबिरांमध्ये मिळालेले सहकार्य याचा विशेषत्वाने उल्लेख केला.
आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी ग्रामीण भागातील पदवी शिक्षणाच्या कमतरतेवर चिंता व्यक्त करत विद्यापीठाच्या या नाविण्यपुर्ण उपक्रमामुळे शिक्षण प्रक्रिया गतीमान होईल आणि शिक्षणाची उणीव भरून निघेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. तसेच संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत सदर वर्ग घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
डॉ. प्रवीण मुधोळकर यांच्याद्वारे ग्रामीण विकास या विषयावर माहिती देऊन या अभ्यासक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत घेर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रमेश चौधरी यांनी तर आभार बी.ए अभ्यासक्रमाचा विद्यार्थी सुधीर नन्नावरे यांनी मानले. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाला अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.