
एका धावत्या ट्रक ला आग लागल्याने , ट्रक जळून खाक…
कोरपना:-
कोरपना तालुक्यातील आसन गावाजवळ अतीभारी गिट्टी भरलेल्या एका धावत्या हायवा ट्रकला अचानकपणे आग लागून ट्रक जळून खाक झाल्याची घटना आज 22 एप्रिल रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास घडली.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून ट्रक मात्र पुर्णपणे जळाला.यवतमाळ जिल्ह्यातील मोहदावरून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना मागच्या टायरने अचानक पेट घेतला.टायर पेटत असल्याची माहिती रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी चालकास दिली असता तो वाहन थांबवून लगेच खाली उतरला.वाहनात कुठलेही अग्निशामक साहित्य नसल्याने तो आग विझवण्यात अपयशी ठरला आणि पाहता पाहता आगीने भीषण रौद्ररूप धारण केले.
राजुरा,गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मार्गाच्या कामावर असलेल्या पाणी टँकरच्या पाईपने सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न झाला.मात्र,आग नियंत्रणात आली नाही.दरम्यान घटनेच्या अर्धा तासानंतर गडचांदूर नगर परिषद व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अग्निशमन वाहन आले व आगीवर नियंत्रण मिळवले.तोवर हायवा ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला होता.आगीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व वाटसरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.