
रस्त्यात गड्डे की गड्ड्यांचे रस्ते.. गोकूळनगर आयटीआय मार्ग झाला अपघातप्रवण….
गडचिरोली ,
गोकुळनगरला आयटीआयशी जोडणाऱ्या मार्गाची एवढी दुर्दशा झाली आहे की रस्त्यात गड्डे म्हणायचे की गड्ड्यांचे रस्ते अशी म्हणायची वेळ आली आहे. सदर रस्त्यावर घातलेला डांबर एक वर्षात नालीत वाहून गेला आणि या रस्त्याचे खरंच डांबरीकरण झाले होते का? अशी म्हणण्याची वेळ आली.
सदर मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे आणि रात्री उशिरापर्यंत या मार्गावर वाहन आणि नागरिकांचे येणे जाणे असते.. सकाळी शासकीय आणि खाजगी कार्यालयात जाणारे कर्मचारी या मार्गावरून घाईघाईने जात असतात. तर रात्री उशिरापर्यंत येणारेही अनेक आहेत.. रस्त्यावर काही भाग वसाहती आहे तर काही भाग निर्जन आहे.. नगर परिषदेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली आहेत. पण रस्त्यावर कुठेही दिव्यांची सोय केलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस मुली – स्त्रियांच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत धोकादायक आहे.
सदर मार्गावर तात्काळ टिकाऊ डांबरीकरण आणि विद्युतीकरण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.. मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आघाडीवर असलेले नगर परिषद प्रशासन गोकूळनगर ते आयटीआय या मार्गाची दुर्दशा स्वतः डोळ्याने बघून दूर करेल काय?? हे बघणे महत्त्वाचे ठरेल