
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कर्मचारी समस्याग्रस्त!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरीली( दि.24).
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत 5 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरु आहेत. सदर शाळा भारत सरकारच्या असून या शाळा समग्र शिक्षा अभियानामार्फत चालविल्या जातात. सदर शाळांचे इयत्ता 6 ते 8 चे वर्ग शिक्षण विभागाव्दारे तर इयत्ता 9 वी व 10 वीचे वर्ग मानव विकास अंतर्गतजोडण्यात आलेले आहेत.
सदर शाळांमध्ये 6 ते 8 वर्गात 100 आणि 9 ते 10 च्या वर्गात 50 मुली शिकत आहेत. या पाचही शाळा निवासी शाळा असून जिल्ह्यातील शाळा बाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत.
या शाळांचे शैक्षणिक व प्रशासकीय संचालन पुर्णत: कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याव्दारे केले जाते हे विशेष. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अथक परिक्षमाने सदर शाळा यशस्वी केलेल्या आहेत. धानोरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या दुर्गम व नक्षलग्रस्त तालुक्यात या शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाकरीता मंजुर असलेल्या पदावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानव विकास मिशनच्या अतिरिक्त वर्गासाठी काम करावे लागते. विद्यालयात कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांना या अतिरिक्त कामाचा मोबदला मिळत नसल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. इतर जिल्ह्यात मानव विकास मिशनकरीता कर्मचारी नेमण्यात आलेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ज्या जिल्ह्यात अतिरिक्त कर्मचारी नेमले नाहीत त्या जिल्ह्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मानधन दिले जात असल्याची बाब समोर आली आहे.समग्र शिक्षा या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पात कार्यरत कर्मचाऱ्यांना सुध्दा अतिअल्प मानधनावर काम करावे लागत असून मागील 6 वर्षापासून हे कर्मचारी मानधन वाढीच्या प्रतिक्षेत आहेत.
अशीच समस्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात निर्माण झाली आहे. या विद्यालयात मानव विकासचे अतिरिक्त कामाचा मोबदला न मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे. निधी उपलब्ध असल्याने ज्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मानधन मिळेल काय? जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा आणि अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी बालिका विद्यालयातील समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांनी केली आहे.