
ट्रकचालकांचा संप अखेर मागे …..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुंबई : हिट ॲण्ड रन कायद्यातील तरतुदी अद्याप लागू झालेल्या नाहीत. त्या लागू करण्यापूर्वी वाहतूकदारांच्या संघटनांशी चर्चा करू, असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याने गेले दोन दिवस सुरू असलेला संप मालवाह मालवाहतूकदारांनी मंगळवारी रात्री मागे घेतला. याबाबत वाहनचालकांना कळविण्यात आले असून, त्यांनी लवकरात लवकर वाहने चालविण्यास सुरुवात करावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरवठाही सुरळीत व्हावा, यासाठी टँकरची वाहतूकही तातडीने सुरू करण्यात येईल, असे मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींनी सांगितले.
केंद्र सरकारने हिट ॲण्ड रन केसप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाखांच्या दंडाची तरतूद कायद्यात केली आहे. त्याच्याविरोधात सोमवारपासून मालवाहतूकदारांनी देशव्यापी संप सुरू केला होता. केंद्र सरकारतर्फे गृह सचिव अजय भल्ला यांनी मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींना आश्वासन दिल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
संप मागे घेतला असला तरी वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेलभरण्यासाठी वाहनचालक पेट्रोल पंपावर धाव घेत होते. वरळी नाका, चेंबूर, सायन, बोरीवली, अंधेरी, माहीम परिसरात वाहतूककोंडी झाली होती.
केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केली आहे. कायद्यातील तरतुदी लागू करण्यापूर्वी चर्चा केली जाणार आहे. आम्ही सदैव वाहनचालकांसोबत आहोत. चालकांनी आता चिंता करू नये. कामावर परतावे.
– बाल मालकीत सिंग,अध्यक्ष, कोअर कमिटी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस
वाहनचालकाने चुकून एखाद्या व्यक्त्तीला धडक दिल्यानंतर या अपघाताची माहिती त्याने पोलिसांना दिली, अपघातग्रस्ताला जवळच्या रुग्णालयात नेल्यास नव्या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
अपघातानंतर चालकाने पोलिसांना माहिती द्यावी किंवा त्याने आपत्कालीन मदतीसाठी १०८ या क्रमांकावर दूरध्वनी करावा व तपासात संपूर्ण सहकार्य करेल, असे त्यांना सांगावे, असे त्यांनी सांगितले.