
योगाजी कुडवे यांनी सुरू केले ठिय्या आंदोलन .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
भामरागड : वनविभागांतर्गत गट्टा वनपरिक्षेत्रात रस्तेबांधणीचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी गिट्टी,आणि माती इत्यादी वन विभागाच्या जागेवरून वापर केला जात आहे. याला वनविभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी स्थानिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात मुख्य वनसंरक्षक तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वनमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. कुडवे म्हणाले की, भामरागड वनविभागाच्या गट्टा वनपरिक्षेत्रांतर्गत मेढरी ते गट्टा या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खडी खोदाई सुरू झाली आहे. मेढरी, वांगेतुरी, गर्देवाडा जंगलात व रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने खोदाईचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सदरील माती, खडी रस्त्यावर टाकली जात आहे. असे असतानाही वनविभागाच्या एकाही अधिकाऱ्याने कोणतीही कारवाई न करून ठेकेदाराला मोकळीक दिली असून, त्यामुळे वनसंपत्तीला धोका निर्माण झाला आहे. जंगलात 20/25 ठिकाणी मोठमोठे खड्डे करून हजारो ब्रास खोदण्यात आले आहेत. असे असतानाही वनरक्षक, वनपाल, वन परिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक, उप वनसंरक्षक भामरागड यांनी कोणतीही कारवाई न केल्याने वनविभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वरील मागणीबाबत सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर दिनांक ०७ फेब्रुवारी पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम, नीळकंठ संदोकार, आकाश मट्टामी, धनंजय डोईजड, रघुनाथ सिडाम, ईश्वर तिवाडे, राजू गडपायले, विलास भानारकर, आशिष नक्षीने, अरविंद देशमुख आदी उपस्थित आहेत.