Breaking
क्रिडा व मनोरंजनगडचिरोली

नवीन पिढीवर झाडीबोलीचे संवर्धन करून विकास करण्याची जबाबदारी -डॉ. श्याम मोहरकर , एक दिवसीय झाडीबोली नाट्यसंमेलनाचे उद्घाटन

मुख्य संपादक

 

 

नवीन पिढीवर झाडीबोलीचे संवर्धन करून विकास, करण्याची जबाबदारी
-डॉ. श्याम मोहरकर.

एक दिवसीय झाडीबोली नाट्यसंमेलनाचे उद्घाटन…

दणका कायद्याचा डिजिटल न्युज

गडचिरोली, दि. 06:

झाडीबोलीला अस्मिता व गौरव आहे. तसेच झाडीबोली साहित्य एक उत्तम असा ठेवा आहे. झाडीबोली नाट्य संमेलनाच्या माध्यमातून परिसरातील कलावंत व विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीवर झाडीबोलीचे संवर्धन करून विकास करण्याची जबाबदारी असल्याचे डॉ. श्याम मोहरकर म्हणाले. गोंडवाना विद्यापीठ येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

 

 

यावेळी मंचावर सुप्रसिद्ध नाट्यकलावंत पद्मश्री डॉ.परशुरामजी खुणे, सुप्रसिद्ध नाट्यकलावंत अनिरुद्ध वनकर, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. एस. चंद्रमौली, समन्वयक डॉ. श्याम खंडारे, नाट्यसंमेलन समन्वयक डॉ. निळकंठ नरवाडे, डॉ. सविता गोविंदवार, डॉ. हेमराज निखाडे, प्राध्यापक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ. श्याम मोहरकर म्हणाले, 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. जीवनात काही साध्य करावयाचे असल्यास प्रचंड तपश्चर्या करावी लागते. ती तपश्चर्या कुसुमाग्रजांनी केली. कुसुमाग्रजांनी सर्वप्रथम “जीवनलहरी” आणि “जाईचा कुंज” यानंतर “विशाखा” हा तिसरा काव्यसंग्रह लिहिला. महापुरुषांनी प्राणाची आहूती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. “स्वातंत्र्यदेवीची विनवणी” यासारख्या कविता तसेच अनेक नाटके व कवितासंग्रह वि.वा. शिरवाडकरांनी लिहिली. तसेच “शहरातील पाच पुतळे” या कवितेतून पुतळ्यांची कैफियत मांडली. शासनाने 2013 पासून प्रत्येक शासकीय कार्यालये, महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विविध कार्यक्रम पार पाडले जात आहे. भाषेच्या बाबतीत पीछेहाट होता कामा नये, यासाठी शासनाने 14 ते 28 जानेवारी कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा तर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

मराठी भाषेला व मायबोलीला जिवंत ठेवण्याचे कार्य ग्रामीण भागातील माणूस करीत असतो. विद्यापीठामध्ये नाट्यमहोत्सव होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्य सेतू नव्हे तर भाषा सेतू उभा करणे आवश्यक आहे. भाषा सेतू उभारण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच बोलीभाषांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश व मुंबई या पाच प्रदेशात 60 ते 70 बोली बोलल्या जातात. त्या प्रदेशातील बोलींची रूपे, शब्दकळा, लय, म्हणी, वाक्प्रचार वेगवेगळ्या आहेत. सगळे प्रवाह साहित्यरूपाने प्रमाण भाषेला येऊन मिळतात. यातून मराठी प्रमाण भाषा निर्माण होते. आज मराठी भाषेचे जतन व संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही डॉ. श्याम मोहरकर म्हणाले.

पद्मश्री डॉ. परशुराम खुणे म्हणाले, झाडीबोलीला अस्मिता व गौरव आहे. या बोलीच्या आचार-विचारांची ओळख व्हावी. झाडीबोलीचा गौरव व्हावा व यातून कलाकार निर्माण व्हावे, याकरिता गोंडवाना विद्यापीठातंर्गत झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. झाडीबोली ही आपली संस्कृती असून त्याला वेगळे महत्त्व बोलीमध्ये आहे. ज्याची नोंद मराठी शब्दकोषात सुद्धा झालेली आहे. या नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळत असल्याचे ते म्हणाले.

अनिरुद्ध वनकर म्हणाले, एकीकडे मराठी भाषेचा गौरव तर दुसरीकडे झाडीबोली नाट्य संमेलन होत असून विद्यापीठात पहिल्यांदाच झाडीबोली नाट्यसंमेलन होत आहे. झाडीबोलीला आचार-विचार आणि संस्कृती लाभली असल्याचे ते म्हणाले. यावेळी अनिरुद्ध वनकर यांनी झाडीबोलीतील गाण्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

 

 

कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन म्हणाले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये राजहंस दडलेला असतो तो ओळखण्याची गरज आहे. याकरीता परिसरातील कलावंत तसेच विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध व्हावा यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी विद्यापीठ नेहमीच एक पाऊल पुढे असल्याचेही ते म्हणाले.
प्रस्ताविकेत बोलतांना, डॉ.निळकंठ नरवाडे म्हणाले, झाडीबोलीचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूने, झाडेबोली नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

 


विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी नोंदविला सहभाग:
गोंडवाना विद्यापीठ येथे आयोजित झाडीबोली नाट्यसंमेलनात पहिल्या सत्रातील एकांकिका स्पर्धेत विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, जनता महाविद्यालय चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मिंडाळा(ता.नागभीड), स्वर्गवासी निर्धनराव वाघाये शिक्षण महाविद्यालय आरमोरी, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, गंगाबाई तलमले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रह्मपुरी तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आदींनी या एकांकिका स्पर्धेत सहभाग नोंदविला.
तसेच दुसऱ्या सत्रातील एकपात्र अभिनय स्पर्धेत नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, श्रीराम वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा, आदर्श महाविद्यालय वडसा, स्वर्गवासी निर्धनराव वाघाये शिक्षण महाविद्यालय आरमोरी, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर आणि जनता महाविद्यालय चंद्रपूर या महाविद्यालयानी एकपात्री अभिनय स्पर्धेत सहभाग नोंदविला.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे